मला मराठी येत नाही

… असं मला भेटणाऱ्या बहुतेक लोकांना वाटतं.

हल्ली आपण समाजासाठी काही करावे अश्या तीव्र इच्छेने मनात केजरीवाल साहेबांसारखे धरणे धरले आहे. कै. श्री. विलासराव देशमुख यांची सलोखा घडवून आणण्याची कुशाग्र कला मनाला अवगत नसल्याने, आम्ही बोलणीची प्रक्रिया थांबवून त्या इच्छेमागच्या सार्वजनिक हिताच्या हेतूला मान देत तिचे सर्व अटी मान्य केले आहेत.

त्यात सगळ्यात वरचे बिंदू ( सिनेमातली नटी नव्हे… इंग्रजीतला ‘point’) – थोडक्यात म्हटलं तर सर्वात प्राधान्याची बाब म्हणजे – “एक लेख मराठीत लिहायचा”; जेणेकरून मायबोली विषयची विरळ होत चाललेली ‘रुची’ (अगदी दुर्मिळ होण्यापूर्वी) जोपासण्याची रसिकांना संधी मिळो तसेच अनंतकाळापासून (म्हणजेच १९८६ पासून) प्रचलित असलेल्या माझ्या विषयीच्या त्या चुकीच्या समजुतीचे निरसन होवो.

आमच्या भागात, म्हणजेच खानदेशात, हिंदीचा जास्त प्रभाव आहे. तसेच काही लोकं वगळता तिथे राहणाऱ्यांना ‘अहिराणी’ चा हेवा आणि माया मराठीपेक्षा जास्त. त्यामुळे अभ्यासक्रमाव्यतिरिक्त माझा मराठीशी थेट संबंध काही आला नाही. ( असं लोकांना वाटतं 😛 )

आमच्या गावाला जर कॉलेजमध्ये ( अकरावी – बारावी ) मी मराठी बोलली तर मराठी शाळेतल्या मुलांना हसू आवरेनासे व्हायचे. ते ठरले बोलीभाषातलं मराठी बोलणारे आणि मी – एकदम पुस्तकी मराठी वापरणारी. त्याच्यात उच्चार चुकायची भीती – कारण वार्षिक तोंडी परीक्षा सोडली तर माझ्यावर मराठी बोलायची वेळच यायची नाही. तरी आश्चर्य म्हणजे मराठीत वर्गात सगळ्यात जास्त मार्क ( आता कोणी गुण बोलत नाही बरं का!) मलाच पडायचे. त्याहून मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे – मराठी मला आईने शिकवलं आहे! (माझी आई मूळ गुजरातची आहे. ३० वर्ष महाराष्ट्रात राहून आता मागच्या ३ वर्षापासून मराठी बोलते! तरी माझ्या लिहण्यात काही चूक झाली असता ती हमखास ओळखायची.)

पुण्याला आल्यावर दुसरीच पंचाईत. गावाकडे माझी मराठी ‘जास्त (अती) शुद्ध’ होती, इकडे आपण बोललो की आपल्या ‘अडाणी’ मराठीची पुणेकर खिल्ली उडवतील – असं समजून आपण दररोजच्या व्यवहारात मराठी काही बोलायचो नाही. नंतर कळले मराठी नाही बोललो (आणि इंग्रजीत बरोबर उत्तरं नाही दिली) तर ‘viva’ मध्ये मार्क नाही मिळत!

त्याआधी गावात आणि पुण्यात मराठी मैत्रिणींशी आपण हिंदी बोलायचो आणि ते मराठी बोलायचे. संभाषण ऐकणाऱ्यांची फार करमणूक व्हायची 😛

४ वर्ष पुण्याच्या कॉलेजमध्ये लागलेली मराठी बोलण्याची सवय नोकरी लागताच मोडली. लग्नाआधीचं आडनाव ऐकूनच सगळे गृहीत धरून घ्यायचे की हिचा मराठीशी काही संबंध नाही. जोगवा सिनेमातलं “लल्लाटी भंडार” हे गाणं माला समजणार नाही असं आमच्या ऑफिसमधल्या परागला वाटलं होतं. गम्मत म्हणजे त्याची मातृभाषा पण मराठी नाही. तो पण लहानचा मोठा महाराष्ट्रात झाला त्या अनुसंगाने त्याला मराठी येते. मला ते पूर्ण गाणं (एक-एक शब्द) समजलं ते बघून सगळ्यांचे चेहरे पाहण्याजोगे झाले होते. अजून आमच्या ऑफिसमध्ये रोज ‘कोणाला मराठी जास्त येतं’ हे सिद्ध करायची competition व्हायची. त्यात पैज लागायची की हा शब्दार्थ प्रशांतला येईल का नाही. (तो पण आमच्याप्रमाणे महाराष्ट्रात राहिला आहे म्हणून त्याला मराठी चांगली येते, आणि जरी मातृभाषा मराठी नसली तरी आम्हाला तेवढाच आदर मराठीबद्दल आहे.) नाही आला तर मोठ्या चर्चाअखेर त्याचा खरा अर्थ सर्वसम्मतीने घोषित केला जायचा. त्यात मी सुद्धा माझी मतं मांडायची – तेव्हा मला पुन्हा पुन्हा सिद्ध करावं लागायचं की मला त्यांच्याइतकच मराठी येतं.

वर्ष २०१३ मध्ये माझे ग्रह बदलले आणि मला नवीन आडनाव मिळाले. सुदैवाने ते एक मराठी आडनाव आहे. त्यामुळे लोकं कमीत-कमी गृहीत तर नाही धरून घेत की हिला आपलं बोलणं कळणार नाही. कधी-कधी अजूनसुद्धा माझ्या हिंदी बोलायच्या सवयीमुळे हा भास कोणा-कोणाला होतो.

उदाहरणार्थ :
परवा पु. लं. देशपांडेंच्या लेखनावर आधारलेल्या एका व्यंगचित्राला मी नकळत एकदम एकाग्रतेने बघत होती. फराळातल्या शंकरपाळ्यांमध्ये शंकर शब्दाचं औचित्य काय आणि शंकर भगवान बशीत शंकरपाळे खात असतील का – असा काहीतरी गहन प्रश्न पुलंनी मांडला होता ( 😛 ). त्यावर काय टिप्पणी करावी यावर चिंतन करत असताना आमच्या ऑफिसमधला विराज (मदतीला म्हणा का कुतूहल ने म्हणा) आला. मी त्याला म्हटलं “काही समजत नाही…”. पुढे काही बोलू त्याच्याआधी तर त्याने पूर्ण व्यंगचित्र शंकरपाळे काय असता तिथपासून समजावण्याची सुरुवात करून दिली होती. (त्याने पुढे ऐकलं असतं तर मी सांगितलं असतं की छंदात काहीतरी लिहायचं आहे पण आता काही सुचत नाही नेमकं.)

तर असं आहे. हुश्शः!

म्हणून आज या लेखद्वारे जाहीर सूचना करण्यात येते की – ” माला मराठी येत नाही, असं मुळीच नाही”. ह्या उताऱ्याव्यतिरिक्त आणखी ठोस पुरावा हवा असेल तर माझे १० वीचे प्रमाणपत्र तपासून घ्यावे – ८३ गुण आणून वर्गात मराठीत १ लं येण्याचे भगीरथ कार्य मी पार पाडले आहे.

कुणी मराठी विद्वानांच्या हाती जर हा लेख लागला आणि त्यांना चुका आढळल्या तर कृपया लक्षात घ्यावे की बाकीचे १७ मार्क अश्या अकुशलतेमुळेच कापले गेले होते. गैरसोयीबद्दल आपली विश्वासू क्षमस्व आहे. आमच्याकडे (पुण्याला) म्हणतात की भावना पोचल्या पाहिजे, मग सगळं माफ असतं.

समाजसेवेच्या इच्छेचे संप आता लौकर संपो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या विधानावर मी माझे दोन शब्द संपवते. आशा आहे वाचकगण ‘भा. पो’ म्हणेल.

22 thoughts on “मला मराठी येत नाही

  1. amazingly written… kudos.. somehow we never happened to conversate much in marathi..

    karan mi marathi asun jasta bolat nahi lol.. :)atta boluyat…

Have your say amigos!